“So!, Tell me something about yourself..” इंटरव्ह्यूअरनं पहीलाच बॉल यॉर्कर टाकला आणि मी क्लीन बोल्ड झालो!
मी लहान असताना एकदा माझ्या आतेभावानं रात्री खिडकीतनं अचानक समोर येऊन आणि भूतासारखी वेडीवाकडी तोंडं करुन, मला जाम घाबरवलं होतं. पुढची बरीच वर्षं मी रात्रीच्या वेळी खिडकीजवळ जायला खूप घाबरायचो. त्यानंतर मला खरंच एखाद्या गोष्टीची खूप भिती वाटली असेल तर, ती म्हणजे हा "about yourself” चा प्रश्न. ह्याचं नेमकं उत्तर काय द्यायचं हा पीएच. डी. च्या प्रबंधासाठी एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. भरपूर workshops attend करुन आणि "सखोल introspection” (हा! हा!) करुनदेखील आमचं घोडं चार-पाच ओळींपर्यंत जाऊन अडखळतं. नाव, गाव आणि कॉलेजचं नाव सांगून झाल्यावर "मी बी.ई. पास झालो (आता, हे काय कमी आहे का?) ह्यापलीकडे सांगण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही" हे आणखी दहा-पंधरा ओळींत खुलवून सांगायचं कसब जर कुणाला ठाउक असेल तर ते कृपा करुन मला सांगावं. मी आयुष्यभर ऋणी राहीन.
आता माझं नशीब बलवत्तर किंवा कॉग्नीझंटचं नशीब खराब जे काय असेल ते, Campus Recruitment मध्ये पहील्याच कंपनीत निवड झाल्यानं इंटरव्ह्यू नावाच्या एका अघोरी प्रथेशी माझा फक्त एकदाच संबंध आलाय. ही प्रथा म्हणजे, माझ्यासारख्या बापड्याचा मानसिक छळवाद मांडण्याचा प्रकार आहे. नको नको तसले अवघड प्रश्न विचारायचे, मी ढ-सारखा गप्प बसलो किंवा काहीतरी विचित्र उत्तर दिले की टोमणे मारायचे, अधून-मधून माझ्या "ज्ञाना"वर हसायचे, आणि एवढ्यावर न थांबता, संध्याकाळी आपल्या मित्रांना भेटलं की, “अरे, माहीतीये का, आज मी एका नमुन्याचा इंटरव्यू घेतला! काय नग होता म्हणून सांगू..” वगैरे वैचारिक देवाण-घेवाण करायची (असं मला वाटतं, बरं का), हा माझा मानसिक छळवाद मांडणे नाहीये का? मग मी पण, “जाऊदे रे.. आपल्यामुळे जर कुणाच्या चेहर्यावर हास्य फुलत असेल, कुणी आनंदी होत असेल तर आपण थोडं सहन करावं" वगैरे अगदी थोर विचार करुन गप्प बसतो.
तसं पहायला गेलं तर, Practical Viva नावाच्या आणखी एका फारच विनोदी अशा प्रथेनं मला, "मठ्ठ गोळ्यासारखे बसून रहाणे”, "ढील देणे”, "नवे-नवे वैद्न्यानिक शोध लावणे (ते पण instant!)”, इत्यादी व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त कला जोपासण्याची बर्यापैकी संधी, चांगली चार वर्षं दिली! त्यामुळे हे तंत्र मला फारसं नवीन आहे अशातला भाग नाहीये. पण काल अनपेक्षितपणे ह्या प्राण्यासमोर बसून इंटरव्ह्यू (खरं तर जे झालं, त्याला इंटरव्ह्यू म्हणणं मला अगदी जिवावर येतयं..) देणं हे म्हणजे, नेट प्रॅक्टीसमध्ये कुठल्यातरी झेंडू बॉलरसोबत प्रॅक्टीस करून डायरेक्ट ब्रेट लीच्या बॉलींगवर बॅटींग करण्याचा प्रयत्न करण्याइतकं मूर्खपणाचं होतं. चार महिन्यांपूर्वी ऑडियो-व्हीडियो इंजि. नामक विषयाची Practical Viva संपली, आणि मी मनाशी म्हटलं, "चला.. सुटलो एकदाचा!". आता काय, नोकरीही लागलीये, तेंव्हा इंटरव्ह्यूचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे आता यापुढे उगाचच कुठल्याश्या अनोळखी प्राण्यापुढे बसून आपल्या अकलेचा उजेड पाडणे बंद होणार! पण कसचं काय? आज कळलं, की हा अकलेचा उजेड आणखी बर्याच ठिकाणी पाडायचा अजून शिल्लक आहे.. असो, तर नेमकं झालं काय..
काल ट्रेनिंगचा शेवटचा दिवस. शेवटची मॉड्यूल टेस्ट उरकते ना उरकते तोच मेलबॉक्समध्ये इ-पत्र येऊन धडकले : प्रोजेक्ट वाटपासंदर्भात भेटायला बोलावलंय. "वा! बाकड्यावर बसणं टळलं!” ह्या विचारानं मी (आणि माझ्यासोबत ज्या तिघांना बोलावणं आलं होतं ते तिघं) जाम खूष! तडक H2 मध्ये बोलावल्या ठिकाणी हजर झालो. आम्हाला एका छानश्या Conference Room मध्ये बसवून आमच्या पी. एम. बाई कुठेतरी गेल्या. मग एक टी. एल. आला आणि त्यानं आम्हाला प्रोजेक्टवर ब्रीफ केलं. खरं सांगायचं झालं तर, मी नुसता नंदीबैलासारखा मान डोलवत होतो. आख्ख्या ट्रेनिंगमध्ये टाईमपास शिवाय दुसरं काहीही केलेलं नसल्यानं मला एक अक्षर कळलं असेल तर शप्पथ. इकडे टी. एल. चं प्रवचन सुरु असताना माझं, “Regression Testing..? हूं.. हे असलं कुठेतरी ऐकलंय खरं..", “बापरे, ह्यानं काही प्रश्न विचारू नयेत म्हणजे झालं..”, “तो बाहेरचा नयनाल्हादकारक सुकांतचंद्राननांचा समूह पॅन्ट्रीकडे चाललाय वाटतं..” वगैरे वैचारिक चिंतन सुरु होतं. शेवटी प्रवचन एकदाचं संपलं. टी.एल गेला. पी.एम. बाई पुन्हा आल्या. आमच्यातल्या दोघांना कुठेशी घेऊन गेल्या. आम्हाला काही कळेना, नेमकं काय चाललंय?
भलतंच टेन्शन आल्यानं किर्ती काहीही बोलण्याच्या पलीकडे गेली होती. तिचा चेहरा पाहून मी पण आपला गप्प बसलो. “बापरे! पावणे सहा झालेत.. नेमकी हीच वेळ मिळाली होती ह्यांना बोलवायला? आज हे माझी बस चुकवणार नक्की.. हे काय, ह्या नयनाल्हादकारक सुकांतचंद्रानना परत येताहेत दिसतंय.. असूदे, आज थोडा उशीर झाला तरी चालेल…!” माझं आपलं आतल्या आत चालू. तेवढ्यात बाई पुन्हा आल्या, आणि किर्तीला घेऊन पुन्हा कुठेशी निघून गेल्या. आता मात्र आतमध्ये मी एकटाच शिल्लक राहीलो. एव्हाना मला पक्की खात्री पटली होती की, मला सोडून बाकी तिघांना ह्यांनी निवडलं असणार प्रोजेक्टसाठी. उगाचच नाही त्यांना माझ्या आधी घेऊन गेले. "बघ गधढ्या, तरी सांगत होतो तुला आपली अक्कल जास्त पाजळू नकोस.. अरे, पण मी तर तोंडच उघडलं नाही अजून. तोंड उघडायची गरजच काय? तोंडाकडे बघूनच अक्कल कळते माणसाची.. जाऊदे रे, ये नही तो कोई और सही.. अरे बापरे! सहा वाजले.. सगळे निघालेत घरी, बस सुटेल आता दहा मिनीटात..”, मी. तेवढ्यात किर्तीनं हाक मारली, आणि मी भूतलावर परत आलो. “जा रे, तुला बोलावतायत इंटरव्ह्यूसाठी..”
“का.य.?” मी अक्षरश: गार पडलो! नक्की कोणत्या जन्मीची पापं आपण फेडतोय ह्याचा विचार करु लागलो. “अरे बाबा, पटकन जा. नाहीतर बस चुकेल आपली..” किर्ती. “ओ.के.” मी. एखाद्या बोकडाला "जा. खाटकानं बोलावलंय" असं सांगीतल्यावर तो बोकड ज्या उत्साहानं खाटकाकडं जाईल, त्या उत्साहानं मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो. एका केविलवाण्या क्यूबिकल मध्ये एक भावनाशून्य चेहर्याचा इसम टेलीफोनवर बोलत बसला होता. त्याचं तोंड पाहून माझ्यात शिल्लक असलेले त्राणही नाहीसे झाले. “Hello Sir..” मी. “Don't call me Sir. I'm ’क्ष’. Call me ’क्ष’. Have a seat..” म्हणून, क्ष नं पुन्हा आपलं तोंड टेलीफोनमध्ये खुपसलं. मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होती माझी चुकलेली बस, आजचं चुकलेलं स्पोर्टसेंटर, आणि माझी Digital Communication ची Practical Viva (आई गं..). पुढची काही मिनीटं मानसिक छळ सहन करण्याची पक्की तयारी करून मी बसलो. क्ष चं टेलीफोनवरचं बोलणं संपलं. आता त्यानं आपला मोर्चा माझ्याकडे वळवला.
“So!, Tell me something about yourself..” क्ष नं पहीलाच बॉल यॉर्कर टाकला आणि मी क्लीन बोल्ड झालो! आता ह्या पी. एम. बाईंना आधीच सांगायला काय झालं होतं की, ’बाबा रे, आज तुमचा इंटरव्ह्यू पण होणार आहे बरं का?’. छानपैकी पाठांतर करून नसतो आलो? आता आली की नाही पंचाईत? अश्याप्रसंगी वेळ मारून नेण्याचा एक छान उपाय माझ्याकडे आहे. अ-मराठी (?) व्यक्तींना, माझ्या नावाचा उच्चार करणं म्हणजे आपल्या जिभेकडून सूर्यनमस्कार घालून घेण्यासारखं असतं! मग पहिल्यांदा मी माझं नाव सांगीतलं. अर्थातच क्ष ला ते झेपलं नाही. त्यानं चार-पाच वेळा माझ्या नावाच्या उच्चाराचे धिंडवडे काढले. मी त्याला नीट समजावलं. शेवटी त्याच्या "ग्या" चा "ज्ञा" करेपर्यंत चांगली दोन-तीन मिनीटं तरी मी खाल्ली होती. मग मी about yourself च्या उत्तरातले राहीलेले सोपस्कार उरकले आणि पुढचा चेंडू खेळायला तयार झालो. पुढची पाच-दहा मिनीटं माझ्या ज्ञानाच्या प्रकाशानं ते क्युबिकल उजळून निघालं. जे झालं त्याचा सारांश थोडक्यात पुढीलप्रमाणे, (कंसात 'मी उवाच'चा मतितार्थ..)
क्ष उवाच : ओ.के., काय काय शिकवलं ट्रेनिंगमध्ये?
मी उवाच : General Overview of Testing. (बरीचशी एक-दीड वर्षांपूर्वी जॉईन झालेली कार्टी Wah-Points मिळवण्यासाठी Training च्या नावाखाली येऊन आम्हाला बोअर करून गेली.)
क्ष उवाच : तू टेस्टींग का निवडलंस? तुला Development मध्ये इंट्रेस्ट नाही का?
मी उवाच: मला वाटतं, टेस्टींग ही SDLC मधली फार Critical स्टेज असते. Quality Assurance आणि Control मला फार चॅलेंजिंग वाटतात. प्लस, त्यात पैसाही आहेच! (मला ह्यातलं ओ की ठो कळत नाही. HR नं, जॉईन होतानाच सांगीतलं होतं की, तुमचं Vertical आणि Horizontal आधीच ठरवून ठेवलंय. तेव्हा न कुरकुरता जे मिळेल ते घ्या. नाहीतर दुसरीकडे नोकरी बघा.)
क्ष उवाच : तुला Unix येतं का?
मी उवाच : आत्ता येत नाही, पण शिकून घेईन नक्की. (तुला येत होतं का, नवीन होतास तेव्हा?)
क्ष उवाच : बरं मग C, CPP?
मी उवाच : हो तर! ट्रेनिंगमध्ये पण शिकवलंय मला. (चक्क धडधडीत खोटं!?)
क्ष उवाच : लेट इट बी. तुला Test Strategy काय असते माहीतीये का?
मी उवाच : हो. Blah blah
क्ष उवाच : Blah blah
मी उवाच : Blah blah
Blah blah
Blah blah
क्ष उवाच : आत्ता तर संपलं ना तुझं ट्रेनिंग. काहीच कसं येत नाही तुला?
मी उवाच : येत कसं नाही. सांगीतलं ना तुम्हाला सगळं. आम्हाला जे शिकवलं तेच मला कळलं. आता ते बरोबर आहे की नाही ते मला कसं ठाऊक असणार? (अरे, बापरे. ह्याला कसं काय कळलं?)
क्ष उवाच : ठीकयं. I'll let u know by tomorrow. लवकर निघ. बस चुकेल तुझी.
मी उवाच : ओ.के. Thank you. (कळलं ह्याला मी किती पाण्यात आहे ते. विसरा प्रोजेक्ट वगैरे.. अरे बापरे.. बस!)
मी क्यूबिकल मधून almost पळतच बाहेर आलो. घड्याळातले काटे बोंबलतायत.. सहा दहा झालेत! “आत काय इंटरव्ह्यू देत होतास की झिम्मा खेळत बसला होतास?” वाल्या नजरेनं किर्ती माझ्याकडे बघून मला घड्याळ दाखवतीये. जेव्हा हवी असते तेव्हा लवकर न मिळणार्या लिफ्टची प्रतिक्षा चाललीये. ऑलिम्पीक चॅम्पीयनला सुद्धा लाजवेल अश्या पद्धतीने आम्ही आमच्या बॅगा सांभाळत धावतोय. समोर बस जातीये. आणि आम्ही धापा टाकत उभे आहोत! आता थांबा तासभर, पुढच्या बससाठी.. छ्या. एकंदरीत काय, तर दिवस वाया जायचा तो गेलाच, त्यावर ट्रेनिंग संपल्याचा (आणि मुख्य म्हणजे मी ते पूर्ण केल्याचा) आनंद क्षणभंगुर ठरला आणि आता तर ही बसही चुकली होती. बाकी, माझी पक्की खात्री पटली होती की हा क्ष माझ्यावर पोट धरून हसत असणार. घरी जाऊन आपल्या मित्रांना आज भेटलेल्या नगाचा (म्हणजे मी) किस्सा सांगणार. पण माझ्या मनाची पूर्वतयारी असल्या कारणानं इतकंही काही वाईट नाही वाटलं मला. नशीब चांगलं म्हणून आशिष भेटला. चिक्कार मोकळा वेळ असल्यानं गप्पा-टप्पा झाल्या. "आमचा इंटरव्ह्यू झाला" हे ऐकून तर त्याचाही ट्रेनिंग संपल्याचा आनंद विरला. साडेसात पर्यंत कसातरी वेळ काढून एकदाची बस पकडली आणि Home Sweet Home गाठलं.
आता एवढं रामायण कथन करून झाल्यानंतर, जर सीतेचं शेवटी काय झालं हे नाही सांगीतलं तर तुम्ही त्या वाल्मिकीच्या कानाखाली नाही वाजवणार का? म्हणून, शेवटी कुणाचं काय झालं ते सांगतो! दुसर्या दिवशी पी. एम. बाईंना फोन करून विचारल्यावर कळालं की मी आणि किर्ती त्या प्रोजेक्टवर अलॉकेट झालो होतो! (Yippee!) आमच्यासोबत ज्या आणखी दोघा जणांना बोलावलं होतं, ते ही दुसरीकडे फिट झाले होते. म्हणजे एकंदरीत काय, तर सगळा शेवट गोड-गोड! असो. पण माझी एक गोष्ट करायची मात्र राहून गेलीये.. मला त्या क्ष ला जाऊन विचारायचंय, की बाबा रे, अगदी मनापासून सांग.. "काय पाहीलंस माझ्यात?” (वेगळ्या अर्थानं, बरं का..?).
6 comments:
Mitra....abhinandan ani all the best....ata project chya gamati jamati lihayala harkat nahi.....aamhi kuNNaala mhaNUn sangaNaar naahI.
Zabraa re Dnyaanaraj !!!
Chhan lihato aahes. Keep it up...
Aata pudhache bhag vachaayala aavadatil ...
By the way, he kunala kalanyaache tension gheu nakos. Sagale hech karatat...
[ Tula aatalyaa gotaatale sangato, mi mazyaa BOSS war lihalele artical BOSS ne vacale aani war mhanala MAST LIHATOS, LIHIT RAHA ....]
झक्कास झालय मित्रा..!!! हे पोस्ट वाचुन झ्याल्या वर...तुझी जुनी पोस्ट वाचली..तेव्हा कळल कि हा ब्लॉग नावाचा भुंगा...!!
पण आता येवढे ब्लॉगर झाले आहे....कि कुनाचा काय वाचु कळत नाहि...अस्सो...!!
शाळेतल्या काही गमती जमती लिही..!!!
एकदम सही लिहीलय... वाचायला खूप मजा आली.
laiiii bhari....
Khhopach chakachak blog aahe be..
Post a Comment