Monday, October 15, 2007

मी आणि माझा MP3 Player

पहील्या पगारानंतर करायच्या गोष्टींच्या लांबलचक यादीतलं एक काम काल सिद्धीस नेलं! एक छानसा-क्यूटसा MP3 Player विकत घेतला. केवढा आनंद झाला म्हणून सांगू! अगदी नोकरी लागल्याचं कळाल्यानंतर सुद्धा झाला नसेल एवढा आनंद! म्हटलं, आता रोज बसमध्ये दोन तास बोअर होणं संपलं! रोज येताना एक तास आणि जाताना एक तास उगाचच बसच्या खिडकीतनं नाईलाजानं मिळणारं पुणेदर्शन आणि रेडिओ मिरची चा तो असह्य डोस यांना एकदाचा पूर्णविराम मिळणार!

काल संध्याकाळी गौरवसोबत ३-४ तास विविध मॉल्स मध्ये संशोधन केल्यानंतर, मला एक नवा साक्षात्कार झाला. एकाच वस्तूची किंमत एखाद्या दुकनात किती असावी हे बऱ्यापैकी पुढील factors वर अवलंबून असते.

१. दुकान एखाद्या झकास पैकी मॉलमध्ये आहे की नाही. २. दुकानात आहे AC की नाही. ३. दुकानातील व्यक्ती मराठीत बोलतात की इंग्रजीत. ४. दुकानात छानपैकी संगीत लावलं आहे की नाही. ५. दुकानात प्रेक्षणीय स्थळे व भीत्तीचित्रे यांची कितपत रेलेचेल असते? असो.

बरीच दुकानं धुंडाळल्यानंतर मला हवा असलेला MP3 Player कमीत कमी किंमतीत विकत घेऊन, मी एखादी लढाई जिंकल्याच्या जल्लोषात दुकनातून बाहेर पडलो. मित्रांबरोबर पार पाडायच्या डिनर, मूव्ही, फालतू गप्पा वगैरे औपचारिकता पार पाडून लगबगीने घरी परतलो. आख्खं User's Manual अतः पासून इति पर्यंत वाचून काढलं. कुठल्या खड्ड्यात काय घुसडायचं, कुठली कळ दाबल्यावर काय होतं वगैरेची पूर्ण माहिती करून घेतली. Finally, माझ्या Player ला गाणी वाजवायला तयार करून झाल्यानंतर, मग सुरू झालं माझ्या MP3s च्या कलेक्शनचं उत्खनन! चांगले २-३ तास खर्ची पाडून मिक्स ब्लेंड असलेलं एक झकासपैकी सिलेक्शन तयार झालं. ते Player मध्ये कॉपी-पेस्टलं अन झोपी गेलो.

आज सोमवार. अगदी नकोसा वाटणारा. अलार्मचे बरेचसे स्नूझ वाजून झाल्यावर, अखेरीस कसाबसा उठलो. आज बसमधलं पु.द. आणि रे.मि.अ.डो. मिळणार नसल्यानं बराच खूष होतो! सगळं आटोपून घराबाहेर पडलो. बस आली. बसमध्ये चढलो. पण नशीबाला जणू माझं बोअर नं होणं मान्यच नव्हतं.

बसमध्ये मला बसायला सीट मिळाली ती नेमकी speakers च्या खालची. वर रेडिओ मिरचीचा तो ठणाणा आणि खाली मज बापड्याचा Norah Jones वगैरे ऐकण्याचा केवीलवाणा प्रयत्न simultaneously सुरु होते! माझ्या बिचाऱ्या कानांना उगाचच काहीतरी सहन करावं लागलं. बरं, Player बंद करावा म्हटलं तर तेही करवत नव्हतं. "काल तर घेतलाय", आणि "काय ते मिरची-बिरची ऐकायचं" वगैरे motivations मला माझा Player बंद करू देत नव्हते, आणि इकडे, हा मिरची बोंबलतोय. बरं आवाज वाढवायचा तर कान नको म्हणतायत. बरेच प्रयत्न करून अखेरीस मी आख्खा अर्धा तास माझ्या Player मधून गाणी ऐकली. जेवढं expect केलं होतं तेवढी मजा नाही आली, पण.. चलता है!

असो.. आज काही फारसं काम असेल असं वाटत नाही, तेव्हा ह्या माझ्या छानश्या-क्यूटश्या MP3 Player चा मनसोक्त उपभोग आज घेईन कदाचीत. ऑफिसात बसून आवडती गाणी ऐकण्याची मजा काही औरच असते नाही का?

No comments: