हा ब्लॉग नावाचा भुंगा बरेच दिवस झाले "गुंईऽ" करतोय माझ्या डोक्यात.
केवढा उदो-उदो चाललाय या ब्लॉगींगचा. माझ्या ओळखीतले सगळे, 'ब्लॉगींग करतात'. (आंघोळ 'करतात', जेवण 'करतात', काम 'करतात' ना, तसं). मुळात, ब्लॉगींग ही संकल्पनाच मला अजून नीटशी कळलेली नाही. डायरी लिहिण्याची सवय लोकांना असते, हे ठाऊक होतं. पण, दुसऱ्याची डायरी वाचायची नसते ना? म्हणून हे ब्लॉगींग नावाचं नवं खूळ, पचायला थोडं जड जातंय. असो.
आज मात्र ठरवलं, म्हटलं, पाहावं एकदा लिहून, उगीचच काहीतरी. म्हणजे नेमकं कळेल तरी, की लोकांना काय मजा येते ब्लॉगींग करण्यात! बाकी, आपल्या रोजच्या खाजगी गोष्टींचं हे असलं सार्वजनिक प्रदर्शन भरवणं, मला काही पटत नाही. त्या आपल्या डायरीमध्येच बऱ्या वाटतात.
"मग ब्लॉगमध्ये नेमकं लिहायचं काय?" असा प्रश्न पडणं साहजिक आहे, नाही का? सखोल संशोधन करूनसुद्धा (म्हणजे, बरेचसे पॉप्युलर ब्लॉग्ज चाळूनसुद्धा) या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.
तेव्हा, माझ्या वाट्याला ही जी काही थोडीफार "ब्लॉगींग स्पेस" आलेली आहे, तिचा वापर नक्की कसा करायचा, हे काही मला सुचत नाही. त्यातच भर म्हणून की काय, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत जो निबंध 'लिहिला' होता ("विज्ञान शाप की वरदान" - छाप), त्यानंतर मी काही 'लिहिलं' असल्याचं ही मला आठवत नाही. एकंदरीत काय तर, हे ब्लॉगींग प्रकरण अंगवळणी पडायला थोडा वेळ लागणार, असं दिसतंय.
आता पुढची पोस्ट लिहीन अशीच केव्हातरी, लिहायचा मूड आला की..!
No comments:
Post a Comment