Thursday, July 23, 2009

मेड माय डे!

तसा सकाळी लवकर उठायचा आणि माझा छत्तीस चा आकडा आहे (रादर, होता). "I hate to wake up early" वाल्या (Garfield झोपेतून उठतोय असं चित्र असलेल्या) orkut वरच्या कम्युनिटी वगैरे ही जॉईन केल्यात मी! गेल्या दोन्ही सेमीस्टर मध्ये आठवड्यातून दोन(च) वेळा सकाळी आठच्या क्लाससाठी तयार होणे हा एक सोहळा असायचा. पण ह्या उन्हाळ्यात लागलेल्या नव्या जॉबमुळे रोज(!) सकाळी साडेसात ला ऑफिसात टच असतो मी! आता ही नियतीची थट्टा वगैरे काहीही असली तरी खरं सांगायचं झालं तर, I enjoy my work, आणि त्यामुळे अजिबात न कुरकुरता मी पहाटे लवकर उठून, आवरून वगैरे तयार होतो, हल्ली. असो, तर आजचा किस्सा..

काल रात्री माझ्या रुम-मेट नं आमच्या गाडीचे ’दिवे लावले’ (!) आणि बंद करायचे विसरला. पुरातन काळातली आमची गाडी, ती बिचारी सगळी बॅटरी ड्रेन करून मोकळी! त्यामुळे आज सकाळी, संकेत मला ऑफिस ला ड्रॉप करणार होता. त्याच्याकडे जाण्याच्या गडबडीत मी आज सकाळच्या नाष्ट्यावर ’पाणी सोडलं’. रोजचा नाष्टा म्हणजे तरी काय, ते दळभद्री कॉर्न फ्लेक्स. ’भारतात नव्हत्या, पण इथे येऊन लागल्या’ ह्या catagory त मोडणार्‍या काही-शे सवयींपैकी एक म्हणजे ’सकाळच्या नाष्ट्याला सिरीअल्स’. सोलापुर-पुण्यात असताना सकाळी इडली, पोहे, उपीट वगैरे इतके माज केलेत की, रोज सकाळी मका खाऊ घालून देव त्याची भरपाई करून घेत असावा. (म्हणजे, मला इतर काही खायला बनवायला हरकत नाही, पण ते केलं तर, तर M.S. सोडून सकाळच्या नाष्ट्याची टपरी टाकायला लागेल.)

असो. आज ऑफिस मध्ये आलो, तर अजून फक्त ऍरन चा च साईन इन होता. बाकी आख्खं ऑफिस रिकामं. काल दिवस भर पाउस पडत असल्यानं आणि आज पहाटेपासनंच सारं ढगाळ असल्यानं, हवा ही बर्‍यापैकी थंड होती. त्यामुळे सगळे थोडे उशीराच येणार हे मी समजून घेतेलेलं. भूक ही लागलेली, म्हणून आज कधी नव्हे ते सकाळच्या नाष्ट्यासाठी मॅक डी ला जायचं विचार कुठून कोण जाणे, पण मनात आला. साडेसात होऊनही, आभाळ भरून आल्यानं अंधार-अंधार असल्यासारखाच. हवा ही एकदम छान. टेक्सास चा उन्हाळा म्हणजे अशक्य! गेल्या आठवड्यात तर पारा ९०फ़ॅ च्या खाली गेलेला मला आठवत नाही. अश्यात आज सकाळी एवढी सुरेख हवा! मॅक डी, माझ्या ऑफिस पासून दोन ब्लॉक्स दूर आहे. तो पाच मिनीटांचा रस्ता चालत जाताना, आठच्या ऑफिस साठी लगबगीनं निघालेली माणसं, रस्त्याच्या त्या बाजूलाच असणार्‍या ’Lubbock High' ला येउन विलीन होणार्‍या स्कूल बसेस हे न्याहाळत मी चाललो होतो. (ऑफिस अवर्स मध्ये हे असले धंदे करण्यात माझा हातखंडा आहे!) मॅक डी त ही फारशी गर्दी नव्हती, पण ड्राईव्ह-इन ला चांगलीच रांग लागलेली दिसली. आत काम करणार्‍यांची ही ’morning rush' मुळे धावपळ चाललेली.

गरमा-गरम ब्रेकफास्ट बरीटो आणि Latte, टू-गो करुन मी परत यायला निघालो. बाहेर ड्राईव्ह-इन च्या रांगेत आणखी दोन-तीन गाड्या वाढलेल्या दिसल्या. परत येताना एखादे-दुसरे स्ट्रीट लॅम्प्सही बंद होऊ लागले होते. मी माझ्या ऑफिस मध्ये परत आलो तोवर आणखी एक-दोघांनी साईन इन केलेलं होतं. डेस्क वर येऊन, कॉम्प्युटर अनलॉक केला आणि कॉफी घेतली. अश्या हवेत गरम कॉफी घशाखाली उतरली की शिल्लक राहीलेला झोपेचा अंशही गायब होतो!

एकीकडे इनबॉक्स ओपन केला आणि मेल पहाता पहाता बरीटो अनरॅप. पहीला घास मुखात गेला, आणि "Made my day!" म्हणजे काय ह्याची प्रचिती आली! त्या ’Ratatouille' मध्ये नाही का, "ऍनटॉन ईगो’ ला ’रेमी’ च्या हातची रॅटाटूई खाउन प्रचंड आनंद होत, मलाही अगदी तसंच पळत जाऊन त्या बरीटो बनवणारी(!)चा मुका घ्यावासा वाटला! (ती दिसायला बरीच चांगली होती, हा एक वेगळा मुद्दा..).

आता मॅक डी चा बरीटो फार चांगला असतो असा ह्याचा अर्थ आहे का? नाही. युनिव्हर्सीटी त ल्या कोणत्याही डायनिंग हॉल मध्ये अगदी असाच बरीटो मिळतो. मग ह्या बरीटोचं काय एवढं कौतुक? Well, कधी कधी सारं जुळून यावं लागतं. कालच्या पावसानं अजूनही थोडे ओले असलेले रस्ते, भरलेलं आभाळ, पहाटेची थंड हवा, सकाळची भूक आणि इतर बरच काही! अजूनही गरम वाफा बाहेर टाकणारा तो रॅप हे फक्त निमीत्त मात्र. मी खालेल्या कित्येक बरीटोंपैकी हा, नेमका ह्या वेळी इथे! नशीबच म्हणायचं, त्याचं आणि माझंही.

केवढं युनिक आहे नाही हे! कित्येकदा काहीतरी वेगळं करायचं ठरवून, विकेण्डला, किंवा सुटीच्या दिवशी, अगदी आदल्या रात्री तयारी करुन देखील, पुढच्या दिवसाची सुरुवात अगदी रोजच्या सारखीच होते. आणि कधी, आजच्यासारखं, ध्यानी-मनी नसतानाही, ’ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर..’ वगैरे गाणी म्हणावीत इतक्या सुरेख पद्धतीनं सकाळ येते. हेच पहा ना, हातातली कामं सोडून ब्लॉगर वर टाईपतोय मी, गेला तास झालं! :)

3 comments:

Anonymous said...

टाळ्या ज्ञानराजा...
माझ्याही अशा अनेक सकाळी इडल्या, वडापाव, मिर्ची भजी, मसाला चहा वगैरे चोचल्यांनी पावन झाल्यात.
तेव्हा हा पोस्ट त्या बरीटो (?) च्या जागी वरचे सगळे पदार्थ टाकून वाचला!

जियो!!

Unknown said...

शेवटचा परिच्छेद लई आवडला!

नवीन पोस्ट टाका साहेब :)

Pouravi said...

Mast Lihlay..Khup avadla :):)