
Disclaimer: ज्यां (अतिशहाण्यां) ना पुढील यादीतील गोष्टी आगोदरच ठाऊक आहेत, त्यांनी ही पोस्ट वाचण्याची तसदी कृपया घेऊ नये. तसेच वाचून झाल्यावर, "हॅ, ह्यात काय नवीन. उगाचच फुशारकी मारायची!" असल्या (फुकटच्या) प्रतिक्रीया (टोमणे) देऊ नयेत. जर आपल्याला असे वाटले, तर आपण "टार्गेट ऑडियन्स" नाही, अशी समजूत करून घ्यावी. एवढं वाचूनही जर पोस्ट वाचण्याची इच्छा असेल, तर ती वैयक्तिक जबाबदारीवर वाचावी.
१. ग्रॅज्युएट आणि फ़्रेशमन मध्ये कमीत कमी चार वर्षांचे अंतर असते, आणि ते अंतर (किमान पेहरावात तरी) दिसावे असे अपेक्षित असते. (कोणाकडून, ते विचारु नये).
२. दर वीस तासांनंतर चार तास झोप ह्या पॅटर्नवर जास्तीत जास्त ९६ तास काढता येतात. (जर कुणाच्या मते हा आकडा चुकीचा असेल, तर तुम्ही हे कधीही केलेलं नाहीये असा अर्थ काढला जाईल.)
३. अन्डरग्रॅज्युएशनमध्ये केट्या असतील, तर थिसीस वगैरे ची स्वप्ने देखील पाहू नयेत. (मास्टर्स ला प्रवेश मिळालाय तीच देवाची कृपा समजावी, आणि दोन वर्षे एखादाही "D" येऊ नये म्हणून नवस बोलावा.)
४. नव्याने टेन्युअर मिळालेल्या चायनीज, कोरीयन, देसी अथवा कोणत्याही प्राध्यापकाचा क्लास (नव्याने सुरु झालेला / क्लास जुना, पण प्राध्यापक नवा) चुकूनही घेवू नये (unless, आपल्याला संशोधनाची खाज असेल). घेण्याची चूक केल्यास, उर्वरित सेमिस्टर अभ्यास करण्याची मानसिक तयारी ठेवावी.
५. मास्टर्स प्रोग्रॅम सुरु केल्यापासून लोटलेला काळ आणि प्रति सप्ताह कोर्स-वर्कवर (वाया) घालवलेला वेळ हे इन्व्हर्स्ली प्रपोर्शनल असतात.
६. आपल्या "ऍक्सेन्ट"चे भान तिन्ही त्रिकाळ ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा "ना घर का ना घाट का" अशी अवस्था होते.
७. पहिल्या सेमिस्टर मध्ये घेतलेली वही शेवट्च्या सेमिस्टर पर्यंत अर्ध्याहून जास्त रिकामी असेल तरच आपण योग्य मार्गावर आहोत हे मानावे.
८. पिझा, हा पैसे देउन खायचा पदार्थ नव्हे. पिझा खायची इच्छा झाल्यास "डॉमिनोज" किंवा "पापा जोन्स" चा नंबर शोधण्यात वेळ वाया न घालवता, त्यावेळी एखादी ग्रुप मिटींग कॅम्पसवर कुठे चालली आहे हे शोधावे. (अश्या ग्रुप मिटींग्स ना, आपला काहीही संबंध नसताना जाउन बसण्याचे तंत्र आंगी बाणायला शिकणे फायद्याचे ठरते.)
९. घरात नेहमी स्वच्छता राखावी, जेंव्हा ची कामे तेंव्हा करावीत, वेळेवर खावे, वेळेवर झोपावे, नियमीत व्यायाम करावा असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये.
१०. सकाळी उठल्यावर दात घासण्याआधी इ-मेल्स आणि फेसबुक/ऑर्कुट/ट्वीटर पहाण्याची सवय लागली असली तरी, सुटीत घरी/नातेवाईकां कडे गेल्यावर "हे" नॉर्मल नाही ह्याची जाणिव स्वत:ला करुन द्यावी. (जेणेकरुन कोणालाच ऑकवर्ड वाटणार नाही.)
आवाहन: यादीत केवळ दहा(च) गोष्टी असणे म्हणजे खरंतर चेष्टाच आहे. Grad School हे कोणत्या महामायेचे नाव आहे, हे ज्याचे त्यालाच ठाऊक. आपण ह्या यादीत आपल्या अनमोल विचारांची भर जरुर घालावी, असे मी नम्र आवाहन करतो.