Friday, July 24, 2009

Thumbs 'अप’!

समर जॉब लागल्याच्या पार्ट्यांचं सत्र सुरु आहे. तेजस नं ’महाराजा’त आणि शंतनु नं ’साईगॉन’ ला अनुक्रमे भारतीय आणि व्हीएतनामी खाणं खाऊ घातल्यानं गेले दोन्ही विकेण्ड चांगलीच चंगळ होती. मी ही ’कुठेतरी खायची ट्रीट द्यावी’ ह्या लोकाग्रहास न जुमानता, मी ह्या विकेण्ड्ला मित्रमंडळींना डिज्ने-पिक्सार चा ’अप’ दाखवण्याचा घाट घातला आणि तो शंभर टक्के यशस्वी झाला!

चित्रपट हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कोणताही विचार न करता पहायला जावा आणि तो हमखास आवडावा असे चित्रपट काढण्याची डिन्जे-पिक्सारची खासियत आहे. ते एक अजब रसायन आहे. गोष्टी सांगण्याची कला जर कुणाला शिकायची असेल तर ती त्यांनी इथल्या geniuses कडून शिकावी. पटकथा भक्कम असली की अभिनय, दिग्दर्शन, संकलन ह्या सार्‍या गोष्टी दुय्यम होतात, आणि एक दर्जेदार कलाकृती निर्माण होते ह्या साध्या-सोप्या ’रुल ऑफ थंब’ ला डिज्ने वर्षानुवर्षं समजून, जपत आलेत. त्यांनी सांगीतलेल्या कित्येक सुंदर गोष्टी ऐकत-पहात, आपण मोठे झालो आहोत, आणि अजूनही ते अश्याच छान-छान गोष्टी सांगतात. पिक्सार ची तर ह्या गोष्टी सुरेखपणे सांगण्यात हातोटी आहे. गेल्या दहा वर्षांच्या आपल्या छोट्याश्या पण यशस्वी प्रवासात त्यांनी ते पदोपदी दाखवून दिलंय, आणि हा चित्रपट ही त्याला ’अप’वाद नाही!

साहसाचं वेड असलेलं एक जोडपं, त्यांनी आयुष्यभर पाहीलेलं, पण संसाराच्या व्यापात कुठेतरी हरवून गेलेलं एका adventure चं स्वप्न आणि त्याची ही कहाणी. कार्ल फ्रेड्रिकसन हे (पुलं च्या वर्णनातील पुणेकर शोभावं असं) आयुष्याच्या सूर्यास्ताकडे वाटचाल करणारं एक व्यक्तीमत्व. लहानपणीच्याच आपल्या एली नावाच्या साहसवेड्या मैत्रीणीसोबत मांडलेला संसार चालवण्यासाठी फुगे विकण्याचा व्यवसाय ह्यानं आयुष्यभर केला. अपत्य नाही, आणि सहचारिणी परलोकी गेल्यानं एकटाच रहाणारा हा कार्ल, थोडा विक्षिप्तच. उमेदीच्या काळात, मोठ्या हौसेनं बांघलेलं त्यांचं हे न्यू-यॉर्क मधलं छोटंसं टुमदार घर, आता मात्र मोठ्या इमारतींच्या पसार्‍यात बरंच ऑड वाटायला लागलंय. आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेलं हे घर, बांघकाम व्यावसायिकांना विकण्यास कार्लचा विरोध. आपल्या विक्षिप्तपणापायी कार्ल ला, हे रहातं घर सोडून ओल्ड-एज हाउस मध्ये रहायला जाण्याची पाळी येते. आयुष्यभर साहसी प्रवासांची स्वप्न पहाणार्‍या कार्ल ला हे असह्य होतं, आणि तो, अखेरीस ही साहसयात्रा करण्याचं ठरवतो.

विस्तीर्ण पसरलेल्या अमेरीका खंडात कित्येक अशी ठीकाणं आहेत, जिथे माणसांनं फार काही पाहीलेलं नाही. रहस्यच आहेत म्हणा ना हवं तर. दक्षिण अमेरीकेतील अश्याच एका ’पॅराडाईस फॉल्स’ नावाच्या रहस्यमयी ठिकाणी जायचे बेत कार्ल आणि एली नं लहानपणीच बनवलेले. आयुष्याच्या सरत्या वेळी तरी, एली साठी का होईना, पण हे स्वप्न पूर्ण करण्याच्या निश्चयानं कार्ल, त्या रहस्यमयी ठीकाणाच्या शोधात निघतो. निघतो खरा, पण जगावेगळ्या पद्धतीनं. फुगे विकणाराच तो! असंख्य फुगे घराच्या कौलांवरून बांघून ’उडत्या घरातून’! शेकडो फुगे, आख्खं घर मुळापासून उन्मळून वाहत घेउन निघतात. काय अचाट कल्पना आहे!

पण ह्या प्रवासात कार्ल एकटा नाही. रसल नावाचा आठ वर्षांचा एक (गुबगुबीत!) विल्डरनेस एक्सप्लोरर, न बोलावलेल्या पाहूण्यासारखा अपघातानं ह्या जगावेगळ्या प्रवासाला चिकटतो. ’वृद्धांना मदत केल्याचा’ बॅज मिळवण्यासाठी, मदत करण्याच्या हेतूनं आलेल्या ह्या पोराला, कार्ल नं एका दिवसापूर्वी एक थाप मारून पिटाळून लावलेलं असतं. मात्र अनपेक्षित पणे, हा पठ्ठ्यादेखील ह्या उडत्या घरात आलेला असतो आणि इथून मजा सुरु होते!

पुढचा सारा चित्रपट म्हणजे केवळ धमाल आहे! ह्या उडत्या घराचं अपघातानं पॅराडाईस फॉल्स ला येणं, पण त्या टेकडीच्या दुसर्‍या टोकावर उतरणं, एका मजेशीर प्रवासाला जन्म देतं. पॅराडाईस फॉल्स पर्यंतच्या प्रवासात कार्ल आणि रसल ना अनपेक्षीत पणे एक नवीन सोबत मिळते आणि ही साहसकथा एका ह्रुदयस्पर्शी कथेमध्ये रुपांतरीत होऊन जाते. रसल आणि नव्या सोबतीस वैतागलेल्या कार्ल चं आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास प्रेक्षकांनाही चांगलाच भावतो. अतिशय साधी सोपी सुरुवात ह्या असणार्‍या कथेचा शेवट आकाशातील थरारक साहसाने होतोय ह्यावर विश्वास च बसत नाही! सुंदर कथेसोबतच, प्रासंगिक विनोद निर्मीती ही देखील ह्या चित्रपटाची उजवी बाजू आहे. "डग" नावाचा "बोलका" कुत्रा तर सर्वांची दाद मिळवून जातो. "अल्फा डॉग" चा बिघडलेला पट्टा ही भन्नाट! कार्ल आणि एली ह्यांचा चित्रपटाच्या सुरुवातीस दाखवलेला जिवनपट, हा माझा ह्या चित्रपटातील "पर्सनल फेवरेट". एकही शब्द न बोलता इतक्या सुरेख पद्धतीनं सांगीतलेली त्यांची कहाणी नकळत "वा!" मिळवून जाते. पिक्सार मधील पटकथा लेखकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

आता डिज्ने-पिक्सार चा चित्रपट म्हटलं की तो, त्यांच्या "शॉर्ट्स" शिवाय कसा पूर्ण होणार?. "गेरीज गेम", "प्रेस्टो", आणि "वन मॅन बॅण्ड" सारखे छान "शॉर्ट्स" देणारे डिज्ने-पिक्सार ह्या वेळी ही आपल्या नावाला जागले आहेत. "पार्टली क्लाऊडी" हा त्यांचा ह्या वेळेचा "शॉर्ट" ही फारच उत्तम जमलाय! अतिशय गोड कल्पना आणि तेवढंच सुरेख "ऍनिमेशन" नक्कीच दाद देण्याजोगं आहे. ("गस" नावाचा तो "self-conscious" ढग मला एवढा आवडलाय, की त्याचं चित्र हे, माझं सध्याचं "ऑर्कुट प्रोफाईल पिक्चर" आहे!) तेंव्हा, चित्रपटाची सुरुवात चुकवू नका!

"शी! कार्टून मूव्ही काय पहायची" असं म्हणणार्‍या तेजस ला ही ’अप’ मनापासून आवडला. स्मरणात राहील अशी एक संध्याकाळ दिल्याबद्द्ल मला "अप" चं खूप कौतुक वाटलं. "ऍक्शन है, ड्रामा है, कॉमेडी है और ट्रॅजिडी भी है" असा हा चित्रपट निखळ मनोरंजन देउन जातो. तुम्ही ही नक्की पहा. मित्रांसोबत, घरच्यांसोबत, चित्रपटगृहात अथवा घरी, तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. "अप" ला माझा Thumbs "अप"!

Thursday, July 23, 2009

मेड माय डे!

तसा सकाळी लवकर उठायचा आणि माझा छत्तीस चा आकडा आहे (रादर, होता). "I hate to wake up early" वाल्या (Garfield झोपेतून उठतोय असं चित्र असलेल्या) orkut वरच्या कम्युनिटी वगैरे ही जॉईन केल्यात मी! गेल्या दोन्ही सेमीस्टर मध्ये आठवड्यातून दोन(च) वेळा सकाळी आठच्या क्लाससाठी तयार होणे हा एक सोहळा असायचा. पण ह्या उन्हाळ्यात लागलेल्या नव्या जॉबमुळे रोज(!) सकाळी साडेसात ला ऑफिसात टच असतो मी! आता ही नियतीची थट्टा वगैरे काहीही असली तरी खरं सांगायचं झालं तर, I enjoy my work, आणि त्यामुळे अजिबात न कुरकुरता मी पहाटे लवकर उठून, आवरून वगैरे तयार होतो, हल्ली. असो, तर आजचा किस्सा..

काल रात्री माझ्या रुम-मेट नं आमच्या गाडीचे ’दिवे लावले’ (!) आणि बंद करायचे विसरला. पुरातन काळातली आमची गाडी, ती बिचारी सगळी बॅटरी ड्रेन करून मोकळी! त्यामुळे आज सकाळी, संकेत मला ऑफिस ला ड्रॉप करणार होता. त्याच्याकडे जाण्याच्या गडबडीत मी आज सकाळच्या नाष्ट्यावर ’पाणी सोडलं’. रोजचा नाष्टा म्हणजे तरी काय, ते दळभद्री कॉर्न फ्लेक्स. ’भारतात नव्हत्या, पण इथे येऊन लागल्या’ ह्या catagory त मोडणार्‍या काही-शे सवयींपैकी एक म्हणजे ’सकाळच्या नाष्ट्याला सिरीअल्स’. सोलापुर-पुण्यात असताना सकाळी इडली, पोहे, उपीट वगैरे इतके माज केलेत की, रोज सकाळी मका खाऊ घालून देव त्याची भरपाई करून घेत असावा. (म्हणजे, मला इतर काही खायला बनवायला हरकत नाही, पण ते केलं तर, तर M.S. सोडून सकाळच्या नाष्ट्याची टपरी टाकायला लागेल.)

असो. आज ऑफिस मध्ये आलो, तर अजून फक्त ऍरन चा च साईन इन होता. बाकी आख्खं ऑफिस रिकामं. काल दिवस भर पाउस पडत असल्यानं आणि आज पहाटेपासनंच सारं ढगाळ असल्यानं, हवा ही बर्‍यापैकी थंड होती. त्यामुळे सगळे थोडे उशीराच येणार हे मी समजून घेतेलेलं. भूक ही लागलेली, म्हणून आज कधी नव्हे ते सकाळच्या नाष्ट्यासाठी मॅक डी ला जायचं विचार कुठून कोण जाणे, पण मनात आला. साडेसात होऊनही, आभाळ भरून आल्यानं अंधार-अंधार असल्यासारखाच. हवा ही एकदम छान. टेक्सास चा उन्हाळा म्हणजे अशक्य! गेल्या आठवड्यात तर पारा ९०फ़ॅ च्या खाली गेलेला मला आठवत नाही. अश्यात आज सकाळी एवढी सुरेख हवा! मॅक डी, माझ्या ऑफिस पासून दोन ब्लॉक्स दूर आहे. तो पाच मिनीटांचा रस्ता चालत जाताना, आठच्या ऑफिस साठी लगबगीनं निघालेली माणसं, रस्त्याच्या त्या बाजूलाच असणार्‍या ’Lubbock High' ला येउन विलीन होणार्‍या स्कूल बसेस हे न्याहाळत मी चाललो होतो. (ऑफिस अवर्स मध्ये हे असले धंदे करण्यात माझा हातखंडा आहे!) मॅक डी त ही फारशी गर्दी नव्हती, पण ड्राईव्ह-इन ला चांगलीच रांग लागलेली दिसली. आत काम करणार्‍यांची ही ’morning rush' मुळे धावपळ चाललेली.

गरमा-गरम ब्रेकफास्ट बरीटो आणि Latte, टू-गो करुन मी परत यायला निघालो. बाहेर ड्राईव्ह-इन च्या रांगेत आणखी दोन-तीन गाड्या वाढलेल्या दिसल्या. परत येताना एखादे-दुसरे स्ट्रीट लॅम्प्सही बंद होऊ लागले होते. मी माझ्या ऑफिस मध्ये परत आलो तोवर आणखी एक-दोघांनी साईन इन केलेलं होतं. डेस्क वर येऊन, कॉम्प्युटर अनलॉक केला आणि कॉफी घेतली. अश्या हवेत गरम कॉफी घशाखाली उतरली की शिल्लक राहीलेला झोपेचा अंशही गायब होतो!

एकीकडे इनबॉक्स ओपन केला आणि मेल पहाता पहाता बरीटो अनरॅप. पहीला घास मुखात गेला, आणि "Made my day!" म्हणजे काय ह्याची प्रचिती आली! त्या ’Ratatouille' मध्ये नाही का, "ऍनटॉन ईगो’ ला ’रेमी’ च्या हातची रॅटाटूई खाउन प्रचंड आनंद होत, मलाही अगदी तसंच पळत जाऊन त्या बरीटो बनवणारी(!)चा मुका घ्यावासा वाटला! (ती दिसायला बरीच चांगली होती, हा एक वेगळा मुद्दा..).

आता मॅक डी चा बरीटो फार चांगला असतो असा ह्याचा अर्थ आहे का? नाही. युनिव्हर्सीटी त ल्या कोणत्याही डायनिंग हॉल मध्ये अगदी असाच बरीटो मिळतो. मग ह्या बरीटोचं काय एवढं कौतुक? Well, कधी कधी सारं जुळून यावं लागतं. कालच्या पावसानं अजूनही थोडे ओले असलेले रस्ते, भरलेलं आभाळ, पहाटेची थंड हवा, सकाळची भूक आणि इतर बरच काही! अजूनही गरम वाफा बाहेर टाकणारा तो रॅप हे फक्त निमीत्त मात्र. मी खालेल्या कित्येक बरीटोंपैकी हा, नेमका ह्या वेळी इथे! नशीबच म्हणायचं, त्याचं आणि माझंही.

केवढं युनिक आहे नाही हे! कित्येकदा काहीतरी वेगळं करायचं ठरवून, विकेण्डला, किंवा सुटीच्या दिवशी, अगदी आदल्या रात्री तयारी करुन देखील, पुढच्या दिवसाची सुरुवात अगदी रोजच्या सारखीच होते. आणि कधी, आजच्यासारखं, ध्यानी-मनी नसतानाही, ’ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर..’ वगैरे गाणी म्हणावीत इतक्या सुरेख पद्धतीनं सकाळ येते. हेच पहा ना, हातातली कामं सोडून ब्लॉगर वर टाईपतोय मी, गेला तास झालं! :)